Advertisement l Terms of Use l Privacy Policy
ShimpiSamaj.in
Post date : 26/Nov/15 10:21 AM
Post by : ShimpiSamaj.in
मेक इन इंडिया ! मेक इन महाराष्ट्र ! डिजिटल इंडिया !

"बिज़नेसमेन्स असोसिएशन ऑफ़ महाराष्ट्र" (बाम) या संस्थेच्या वतीने मेक इन इंडिया - मेक महाराष्ट्र या विषयावर दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन , भायंदर या निसर्गरम्य व अतुच्य सेवा असलेल्या ठिकाणी २१ व २२ नोव्हेंबर २०१५ रोजी हे शिबीर आयोजित केले होते. कार्यक्रमाला जवळपास १५० हून अधिक उद्योजक व विद्यार्थी उपस्थित होते.

बामचे सचिव श्री. प्रदीप मालणकर यांनी संस्थेबद्दल माहिती दिली व मेक इन इंडिया ! मेक इन महाराष्ट्र ! डिजिटल इंडिया ! कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. जरी सर्वत्र हा विषय वरवर ऐकला जात असला तरी मुळात त्या विषयावर कुठेच काही योग्य मार्गदर्शन केले जात नसून उद्योजकांना योग्य माहिती योग्य व्यक्तींकडून मिळावी यासाठी हे शिबीर भरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विविध मुद्यांवर प्रकाश टाकला. लघु उद्योजक हा देशात ५०% हून अधिक रोजगार निर्मिती करीत आहे व देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातही जवळपास ५०% वाटा हा लघु व मध्यम उद्योजकांचा आहे व असे असूनही १०००० उद्योजकांनी जर उद्योग सुरु केला असेल तर एका वर्षानंतर फक्त ३००० उद्योगच टिकतात व पाच वर्षानंतर फक्त १००० उद्योगच जिवंत राहतात. त्यातही ५ ते १० उद्योग मोठे होतात.

उद्योग सुरु करण्यासाठी ७६ परवाने लागतात ते कमी करून ३८ केले असून २ ते ३ महिन्यात हे परवाने २५ पर्यंत आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. इज ऑफ डुइंग बिझनेस मध्ये भारताचा जगभरात १३९ वा क्रमांक लागत असून तो पहिल्या ५० मध्ये आणण्याचा पंतप्रधान मोदींची मनीषा असल्याचे त्यांनी सांगितले. सिडबी बँकेला सरकारने २०० करोड रुपयाचा निधी उभा करण्यासाठी सांगितले असून सरकारने त्यासाठी ७५ करोड रुपये दिले आहेत व या निधीचा उपयोग लघु व मध्यम उद्योजकांसाठी होणार आहे.
आमदार नीलम गोऱ्हे यासुद्धा विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या व महिल्या उद्योजकांचे प्रश्न त्यांनी मांडले. सर्व कंपन्यामध्ये महिला संचालक बंधनकारक असून ३०% हून कमी कंपन्यांनी महिला संचालक नेमल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

पहिल्या दिवसाच्या सत्रांमध्ये श्री. सुधीर मुतालिक, श्री. अशोक सुभेदार, श्री. दिपक करंजीकर, सौ. अर्चना वाणी, श्री. अतुल राजोळी हे वक्ते होते.

पॉजीटीव्ह मिटरींग पंप्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुधीर मुतालिक यांनी मेक इन इंडिया चा लोगो कसा बनला, त्याची निवड कशी केली गेली याबद्दल माहिती दिली. देशामध्ये उत्पादन क्षेत्र वाढीला लागावे यासाठी मेक इन इंडिया सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. २०१३ मध्ये उत्पादन क्षेत्राची वाढ फक्त १.९ टक्के इतकीच झाली जी अत्यंत कमी होती. मेक इन इंडिया त्याचवेळेला सुरु व्हावे हे अगदी योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र हा खूपच उपयुक्त कार्यक्रम असून हा कार्यक्रम यशस्वी झाल्यास देशाला यातून नक्कीच प्रचंड फायदा होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.

डी एस ए इलेक्ट्रो कंट्रोलचे श्री. अशोक सुभेदार यांनी सरकारच्या मेक इन इंडिया ! मेक इन महाराष्ट्र ! कार्यक्रमाचे स्वागत केले. यामुळे उत्पादन क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा वाढण्यास मदत होईल व नवीन नोकऱ्यांची निर्मिती होईल. कुशल कामगार व परिपूर्ण पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे मेक इन इंडिया ! मेक इन महाराष्ट्र ! सत्यात उतरण्यास त्रास होत असल्याचे मत त्यांनी मांडले.

मेक इन इंडियाचे उद्दिष्ट देशाची प्रगती करणे हे असून शाश्वत अर्थव्यवस्था बनविण्यासाठी, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी, भारतातच नवनवीन शोध लावण्यासाठी तसेच झिरो डिफेक्ट - झिरो इफेक्ट साठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. झिरो डिफेक्ट - झिरो इफेक्ट म्हणजे वस्तू बनवितानाच कोणत्याही दोषाशिवाय बनवावी व ती बनविताना तसेच वापरताना निसर्गावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जावी असे त्यांनी सांगितले.

सरकारने बरेच परवाने ऑनलाइन केले असून काही परवान्यांचा कालावधी ३ वर्षावरून ७ वर्षे केला आहे. दिल्ली मुंबई कॉरीडॉर, डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर, स्मार्ट सिटी, सौरऊर्जा विषयी नवीन नियमावली, संरक्षण उत्पादनाबद्दल नवीन नियमावली या सर्व गोष्टी मेक इन इंडियाचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.

लेखक, अभिनेते व उद्योजक असलेल्या श्री. दिपक करंजीकर यांनी वास्तवाचे दर्शन दाखवीत मेक इन इंडिया ! मेक इन महाराष्ट्र ! हे स्वप्न असल्याचे मत व्यक्त केले. भारताने उत्पादनाच्या ऐवजी सेवाक्षेत्राचे बोट पकडून चूक केली व त्यामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. भारत हा मुळात उत्पादन क्षेत्रातील देश आहे व उशिरा का होईना मेक इन इंडिया ! मेक इन महाराष्ट्र ! सुरु केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले.

उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राचा देशात ८ वा क्रमांक असून २००८ ते २०१५ या कालावधीमध्ये महाराष्ट्रावर ३,४०,००० करोड रुपयाचे कर्ज झाले आहे. जवळपास ७२००० उद्योग महाराष्ट्रात बंद झाले असून तीन लाखाहून अधिक लोक बेरोजगार झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त एफ डी आय येत असून सर्वात जास्त शेतकरी आत्महत्याही झाल्याचे त्यांनी नमूद केले. ७६ परवाने ३८ झाल्याचे कुठेच दिसून आलेले नाही. इन्स्पेक्टर राज अधिक वाढले असून भ्रष्टाचार आधीपेक्षा दुप्पट झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे मत त्यांनी मांडले.

मेक इन इंडिया ! मेक इन महाराष्ट्र ! कार्यक्रम आश्वासक असला अनंत अडचणीमुळे तरी सत्यात उतरणे अवघड असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाच्या मुंबई विभाग सचिव सौ. अर्चना वाणी यांनी मेक इन इंडिया ! मेक इन महाराष्ट्र ! या उपक्रमावर भाष्य करताना सरकारची बाजू उद्योजकांसमोर मांडली तसेच मुद्रा योजनेमुळे लघु व मध्यम उद्योजकाना होणारे फायदे नमूद केले.

पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात बॉर्न टू विन चे श्री. अतुल राजोळी यांनी उद्योजकांमध्ये स्फूर्ती निर्माण करत उद्योग वाढीसाठी व स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक मुद्दे मांडले. इंटरनेट - ई कॉमर्स, ऑटोमेशन, जागतिकीकरण, बदलत चाललेले तंत्रज्ञान या विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात सोमय्या कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. वैशाली वाढे यांनी डिजिटल इंडिया विषयवार प्रेझेन्टेशन दिले. त्यानंतर "एम इंडिकेटर"चा निर्माता सचिन टेके व डॉ. वैशाली वाढे यांची मुलाखत घेण्यात आली. सचिन टेके याने प्रत्येक अडचणीत संधी शोधावी असा कानमंत्र दिला व अशाच एका अडचणीतून एम इंडिकेटरची निर्मिती झाल्याचे सांगितले. एम इंडिकेटरचा उपयोग आज जवळपास एक करोड जनता करीत असून त्याचा आपल्याला अभिमान असल्याचे त्याने सांगितले. डिजिटल इंडिया म्हणजे आपला उद्योग ऑनलाइन करणे व इतर अनेक गोष्टी ऑनलाइन करणे असा अर्थ असून यामुळे जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होईल असे मत डॉ. वैशाली वाढे यांनी व्यक्त केले.

मिटकॉन चे डॉ. बावडेकर यांनी देशात एफ डी आय येणे आवश्यक असल्याचे सांगितले ज्यामुळे अर्थव्यवस्था वाढू शकेल. ट्रान्स एशिअन चेंबर ऑफ कॉमर्सचे श्री. संजय भिडे, तरुण उद्योजक श्री. भूषण जाधव व अर्थतज्ञ श्री. चंद्रहास देशपांडे यांचाही मुलाखतीचा कार्यक्रम झाला. मेक इन इंडिया ! मेक इन महाराष्ट्र ! या विषयावर त्यांनी आपआपले विचार त्यातून मांडले. जयदेव बर्वे यांनी शाश्वत शेती या विषयावर मार्गदर्शन केले. शेतीद्वारे मेक इन इंडिया ! मेक इन महाराष्ट्र ! स्वप्न पूर्ण करता येऊ शकेल असे मत त्यांनी मांडले.

बँक ऑफ बडोदा यांचे प्रमुख प्रायोजकत्व कार्यक्रमाला लाभले होते. श्री. गुजराथी यांनी बॅंकेतर्फे उद्योजकांसाठी उपलब्ध योजना उपस्थितांसमोर मांडल्या. युनियन बँक, प्रो फीट, डी एस ए इलेक्ट्रो कंट्रोल व नितीन इंटरप्रायजेस यांचेही सहकार्य व प्रायोजकत्व लाभले होते. लोकमत व मी मराठी हे मिडिया पार्टनर होते. अर्थसंकेतने आउटरीच पार्टनर म्हणून काम केले त्याबद्दल श्री. अमित बागवे व सौ. रचना बागवे यांचे आभार प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रमातून उद्योजकांना मेक इन इंडिया ! मेक इन महाराष्ट्र ! या सरकारी उपक्रमाची रूपरेखा स्पष्ट झाली व त्यामुळे त्यांना होणारा फायदा जाणवला. बिज़नेसमेन्स असोसिएशन ऑफ़ महाराष्ट्र या संस्थेच्या या कार्याबद्दल उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.

arthsanket.in
arthsanket@gmail.com
facebook : arthsanket
youtube channel : arthsanket. tv

www.shimpisamaj.in